हा काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल ,माजी सनदी अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री श्री. जगमोहन यांच्या मूळ My Frozen Turbulence in Kashmir या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद. हा अतिशय वेधक ग्रंथ, इतिहासाचा वेध घेत, ते जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्याचे दोनदा राज्यपाल असताना घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण सादर करतो. नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी किती विस्तृत विषयांचा परामर्श यात घेतला आहे याची कल्पना येते. वैशिष्ट्य हे की या सर्व प्रश्नांचं विश्लेषण करताना त्यांनी कुठेही कशाचाही आग्रह धरलेला नाही. लेखकापाशी ज्याचा अकाव्य पुरावा नाही तो मुद्दा त्यांनी मांडलेला नाही.घोंघावत येत असलेल्या वादळाचे 'धोक्याचे इषारे' कसे उपेक्षिण्यात आले आणि त्याचे परिणाम किती महाभयंकर झाल्रे ते त्यांनी अत्यंत कळकळीने पटणाऱ्या शैलीत मांडले आहे. सखोल अंतर्दृष्टीने मुलभूत प्रश्नाच्या मुळाशी जाऊन श्री.जगमोहन यांनी 'बोटचेप्या' व 'खपवून घेणाऱ्या अनुज्ञा-धोरणापायी' काय काय भोगावे लागत आहे ते निर्भीडपणे मांडलंय. भ्रम पाळण्याची मनोवृत्ती, कठोर वास्तवांना सामोरे जाण्याऐवजी बनवाबनवी आणि फसवाफसवीचं व दुटप्पीपणाचं राजकारण कसं होत गेलंय, दुबळं प्रशासन व सरकारातील भ्रष्टाचार यांच्यामुळे काश्मीर व केंद्र यांच्यातील संवैधानिक संबंध विघटनवादास प्रोत्साहन देण्यास कसे कारणीभूत होत आहेत आणि एकंदरच नकारात्मक वृत्ती-प्रवृत्ती कशा कार्यरत आहेत याचा अतिशय चिंतनिय असा ताणाबाणा या पुस्तकात विणला आहे. दहशतवादाचं पाशवी स्वरूप आणि विद्रोहाचे चित्र फारच चिंतनशील मनीषीप्रमाणे लेखकानं रेखाटलं आहे.भारतीय राजकारणातील गोंधळ आणि अंतर्विरोध यांचं लेखकानं केलेलं विश्लेषण व वर्णन अंतर्मुख करणारे आहे. विपर्यास आणि विकृत यांचं चित्र फार मार्मिकपणे दाखवून दिले आहे. वरपांगी विचार करणारे हितसंबंध कोणता खेळ खेळत आहेत ,ते त्यांनी क्ष किरण यंत्रासमोर उभे राहिल्यावर दिसते तितक्या स्पष्टपणे बिनचूक दाखवून दिलं आहे. ते अत्यंत हिरीरीने आपल्याला सांगतात की समस्या अतिशय जटिल आहेत, जुनाट आहेत आणि देशाच्या भावविश्वात खोलवर रुजलेल्या आहेत. काश्मीर हे अत्यंत खडतर आव्हान फक्त सुधारीत आणि परिष्कृत भारतच पेलू शकेल, असा भारत की ज्याच्यापाशी 'उद्या' चा वेध घेणारी दृष्टी आहे व वास्तवाचं भान ठेवून व्याहारिक उपाय योजण्याची जिद्द आहे. श्री.जगमोहन हे एक जोमदार कृतीशील आणि गहन चिंतनशील व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाचा ठसा त्यांच्या या आगळ्या वेगळ्या ग्रंथाच्या पानोपानी आढळतो.
.