सौ.स्मिता भागवत लिखित ‘#सरदार…वल्लभभाई पटेल ‘ या मोरया प्रकाशन लवकरच प्रकाशित करीत असलेल्या महत्वपूर्ण ग्रंथातील काही भाग…

आज पंधरा डिसेंबर! १९५० साली याच दिवशी लोहपुरुष म्हणून प्रसिद्धी पावलेले, संस्थाने विलीन करून देशास एकसंध स्वरूप प्रदान करून आधुनिक भारताचे शिल्पकार ठरलेले सरदार वल्लभभाई पटेल अतीत बनले! त्यांच्या अनुपम कार्यास वंदन! ते यशस्वी राजकारणी आणि समाजकरण करणारेही! या कणखर महानुभावच्या स्वभावातील मिष्किलपणाची चुणूक देणारा हा अंश, त्यांच्या संदर्भात मोरया प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या आगामी ग्रंथातील भाग आहे!

सरदार पटेल यांचे राजकारण आणि समाजकारण!

बॅरिस्टर वल्लभभाईंनी राजकारणात प्रवेश केला तरी ते वकीलीही करत होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी राजकारणाचा योग्य वेध घेण्याइतकीच, समाजाच्या उत्थानाची नि सहकाराची गरज गांधीजींनी अधोरेखित केली. त्यामुळे वल्लभभाईंना आपले व्यवसाय आणि देशभक्ती अशा दोन दगडांवर पाय ठेवणे हे कोणत्याही भूमिकेस न्याय न देणे आहे, हे जाणवले. म्हणून त्यांनी बॅरिस्टरीवर पूर्णविराम ठेवला. एकाच जन्मात बॅरिस्टर पटेल जणू दुसऱ्या अवतारात प्रवेशले. तो अवतार होता निखळ राजपुरुषाचा! गुरूच्या विचारानुसार राजकारण यशस्वी करण्यासाठी समाजकारण हाती घेणाऱ्याचाही!गांधीजी वारंवार म्हणत, “स्वांतत्र्याचा लढा मोजक्या बुद्धिप्रामण्यावादी सुशिक्षितांकडून झाला तर तो पाण्याच्या बुडबुड्यासारखा वरवरचा आणि क्षणभंगूर ठरेल. दूरगामी परिणामासाठी तळागळातील प्रजेत स्वातंत्र्याची भूक निर्माण झाली पाहिजे. तर आणि फक्त तरच स्वातंत्र्याचा लढा खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. म्हणून सामान्य प्रजेस या आंदोलनात सामील करून घेण्याची नितांत आहे!” वल्लभभाई, गांधीजींचा सच्चा शिष्य! त्यांनी गुरूने दाखवलेल्या मार्गावर वाटचाल सुरू केली. त्यांचे एक पाऊल समाज सुधारकाचे नि दुसरे राजपुरुषाचे! पटेल समाजातील हुंड्यासारख्या करियावरच्या प्रथेचा तसेच तेराव्याच्या गावजेवणाच्या प्रथेचा ते सातत्याने विरोध करतच असत. त्यामुळे त्यांना या अशा दोन पावलांचा समतोल साधणे सहज जमले. त्यांच्या कठोर स्वरात गांधीजींच्या मृदू स्वराचे मार्दव प्रवेशले. आणि तरीही त्यातील टणत्कार फिका पडला नाही!

रौलट अॅक्ट विरोधात गांधीजींनी सत्याग्रह सुरू केला. त्यात हरताळ, असहकार वगैरे प्रकार सुरू झाले. गावोगावी कर्फ्यू असल्यागत वातावरण स्तब्ध झाले असताना जालीयनवाला बागेच्या नृशंस हत्याकांडाच्या विरोधात गांधीजींनी उपोषण जाहीर केले. जालियनवाला बागेची वार्ता देशभर पसरली होतीच. त्यामुळे सुजाण हिंदू-मुस्लीम प्रजा गांधीजींचे समर्थन करण्यास उपोषणावर उतरली. वल्लभभाईंनी हे लोण घरोघरी फिरून तळागाळातील सामान्य तसेच अतिसामान्य लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भूक निर्माण केली होती. परिणामी सामान्य प्रजा गांधीजींच्या राजकीय कार्याची माहिती मिळवण्यास उत्सुक बनली होती. म्हणून वल्लभभाईंनी मोर्चा काढून या कार्यास वेग देण्यास पुढील योजना आखली.

सत्याग्रह सुरू होताच सरकारने हिंद स्वराज आणि सर्वोदय या गांधीलिखित पुस्तकांच्या विक्रीवर बंदी लादली. तरीही वल्लभभाईंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या साथीदारांनी ही पुस्तके विकण्याची घोषणा केली. घोषणा अंमलात आणून त्यांनी विक्रमी विक्रीही केली. त्याच दिवशी वल्लभभाईंच्या घरी सत्याग्रह नावाच्या पत्रिकेच्या प्रती छापण्यात आल्या. या पत्रिकेचे रजिस्ट्रेशनही न करता, वल्लभभाईंनी एकाच दिवशी दोन कायदे मोडण्याचे ऐतिहासिक साहस केले. दुसऱ्या दिवशी जाहिरपणे विक्रीस ठेवण्यात आलेल्या या पत्रिकांवर संपादक आणि मुद्रक म्हणून आपले नाव छापण्याचा त्यांनी बिनधास्तपणा केला. सत्याग्रही या पत्रिकेची शेवटची प्रतही त्याच दिवशी विकून मोकळे झाले. हा प्रकार सरकारी अधिकाऱ्यांसाठी कमालीचा अनेपेक्षित असल्याने, शासन इतके किंकर्तव्यमूढ झाले की वल्लभभाई वा कायदेभंग करणाऱ्या एकाही साथीदारास अटक करणे वा सजा करणे शासकीय अधिकाऱ्यांना सुधरले नाही.

बॅरिस्टरीप्रमाणे वल्लभभाईंचा राजपुरूष आणि समाज सुधारकाचा नवा अवतारही वेगाने यशस्वी होत होता. कच्छ परिसरात अस्पृश्यतेच्या संकल्पनेचा अतिरेकी आग्रह असे. आग्रह धरणाऱ्यात स्वतःस गांधीवादी म्हणवणाऱ्या बऱ्याच गांधीशिष्यांचा समावेश होता. वल्लभभाईंना ढोंग अजिबात पसंत नसल्याने त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे काम हाती घेतले.
गांधीजी अस्पृश्यतेस सामाजिक कलंक समजत. त्यांना आदराने हरिजन म्हणत. लक्ष्मी या हरिजन कन्येस त्यांनी दत्तक घेतले होते. गांधीजींच्या या कृतीची प्रशंसा करत अस्पृश्यता परंपरा पाळणारे बरेच जण होते. तरी ते स्वतःस गांधींचे पाईक म्हणवत. शहानिशा न करता विश्वास ठेवणे, हा गांधीस्वभाव! या उलट वल्लभभाई! साक्षीदाराची कठोर उलट तपासणी करत ते सत्याचा शोध घेणारे यशस्वी बॅरिस्टर! वकीली सोडली तरी रक्तात भिनलेली ही सवय त्यांचा श्वास-प्राण होती. गांधीजीही बॅरिस्टर! पण त्यांचा बॅरिस्टरचा पिंडच नव्हता. त्यांच्या मवाळ वर्तनात कुशल बॅरिस्टरचा सदैव अभाव जाणवे. बॅरिस्टरचा आग्रही टणत्कार वल्लभभाईंच्या स्वर-शब्दात सतत निनादत असे. ते ढोंगावर घणाघाती प्रहार करण्यास कधीच कचरत नसत…..

डॉ.परीक्षित शेवडे यांनी 'समर्थ' चे केलेले विशेष विवरण !

December 15, 2019

'मोरया' चे 'सरदार' - दिलीप महाजन यांचे विशेष प्रकाशकीय

December 15, 2019

Leave a Reply