काय चुकले ? काय हुकले ?
गेल्या काही दिवसांत आपल्या देशाच्या शेअरबाजारात , आणि एकंदरीतच गुंतवणूक व आर्थिक क्षेत्रात घडत असलेल्या घटना बघताना मला कविवर्य कै . श्री .सुधीर मोघे यांची ” पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी ” ही कविता सारखी आठवत आहे .
ती कविता अशी आहे ……
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी
क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात.
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात.
कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते,
चुक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायची नसते
एक कृती, एक शब्द
एकच निमिष हुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी !
इतकेच नाही , तर माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे की आपल्याला नेमकेपणाने जास्त बोच , दुःख , सल , वेदना जास्त कशाची असते ….एखादी गोष्ट चुकण्याची की एखादी गोष्ट हुकण्याची ?
आता हेच बघा ना …
काल ( गुरुवार , मार्च १९ ,२०२०) आपल्या शेअरबाजारात दिवसभराची उलाढाल सुरू होतानाच मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक खालच्या पातळीवर होता . दिवसभरात तर तो एक वेळ जवळजवळ १७५० अंशांनी खाली होता . टेक्निकल अनालिसिसवर विश्वास असणारे नेहमीच ज्या ” इजा – बिजा – तिजा ” चा दाखला देत असतात , अशी ती वेळ होती . अत्यंत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सक्षम कंपन्यांच्या शेअर्सची कमी भावाने खरेदी करण्याची ती सुवर्णसंधी होती .
हे न कळणे ही चूक होती .
आणि हे कळूनही बाजार अजूनही खाली जाईल असं वाटत राहाणे हे चूकणे नसून “हूकणे ” होते .
चुकणे आणि हुकणे यांत काही फरक आहे का किंवा असतो का हा प्रश्न कदाचित आपण “‘ पुन्हा पुन्हा चुकण्यासाठि नेहमीच वैकल्पिक ( ऑप्शनल हो ) ठेवला आहे .
होते असे ….
चूक होत असताना अनेकदा त्याचवेळी आपण चुकत आहोत हे अनेकदा जाणवत असते .
पण वेळ हुकली हे मात्र बऱ्याचदा नंतरच कळते …निदान तसं मानले जाते .
काल ( १९ मार्च २०२० रोजी ) निर्देशांक १७५० अंशांनी खाली असताना तो अजूनही खाली जाईल असं वाटत होते . पण प्रत्यक्षात त्यात सुधारणा होत गेली . आपले काहीतरी ” हूकलय ” हे त्यावेळी जाणवायला लागले . पण माझी मीच समजूत करून घेत होतो की आज बाजार बंद होताना निर्देशांकातली ही सुधारणा टिकणार नाही . कारण गेल्या काही दिवसातल्या चढ – उतारांची तशी साक्ष होती आणि आहे . आणि खरंच ही सुधारणा टिकली नाही . दिवसभरात खाली येऊन वर चढलेला निर्देशांक दिवसाअखेर खाली आलाच . ( निर्देशांक वर चढलेला म्हणले आहे ; वर गेलेला नाही ! ) .त्यावेळी आधीच्या दिवसाच्या तुलनेत सेन्सेक्स सुमारे ६०० अंशांनी खाली बंद झाला .
पण ६०० म्हणजे १७५० नाही ना ?
आणि यातल्या कोणत्याही पातळीवर मी खरेदी केली(च) नाही(च) ना !
केलीच नाही .
दुसऱ्या दिवशी तर तो निर्देशांक वरच्या पातळीवरच उघडला .
काय चुकले ? काय हुकले ?
गुरवार , १९ मार्चच्या या प्रवासात आणि गेल्या आठवड्यातल्या दिवसभरातल्या ५००० `अंशांच्या चढ – ऊतारातही काही शेअर्स असे होते की त्यांचे बाजारभाव त्या दिवसभरात वाढले .
अजून काही शेअर्स असे होते की त्यांचे बाजारभाव अशा दिवशी सुद्धा तुलनेने स्थिर राहिले .
अजूनही काही शेअर्स असे होते की त्यांचे बाजारभाव कमी झाले ; पण ही उतरण शेअरबाजाराच्या निर्देशांका इतकी वादळी नव्हती .
बाकीचे शेअर्स असे होते की ते बाजारापेक्षाही धमाल उड्या मारत होते .
आपण यातल्या कोणत्या प्रकारच्या शेअर्सचा जास्त विचार करत होतो ….
करत असतो ….
अशा दिवशीही …
आणि एरवीही ….
कारण असं अनेकदा होत असते .
बाजारातले असे दिवस वादळी असतात हे खरेच . पण संगणकीय क्षेत्रातली उपमा द्यायची तर हीच तर Stress Test , Volume Test असते ….आपली , शेअर्सची आणि बाजाराचीही !
पण माझे सातत्य वाखाणण्याजोगे असते ….चुकण्यातही आणि हुकण्यातही …
कसं शोधणार ….काय चुकले आणि काय हुकले ?
असं शोधणे वाटते तितके कठीण नसते .
एक तर अशा तंत्राची अगदी सोदाहरण चर्चा मी माझ्या गुंतवणूक कार्यशाळेत करत असतो .
गुंतवणूक पंचायतन आणि मार्केट मेकर्स या माझ्या पुस्तकांत केली आहे . याचे संकेत ” मोदी अर्थकारण : नीती आणि रणनीती व केल्याने देशाटन या माझ्या पुस्तकांत दिले आहेत .प्रसंगांनुरुप आणि विषयानुरुप त्याची चर्चा माझ्या भाषणांत मी करत असतो .
आणि दुसरे म्हणजे सुधीर मोघे त्यांच्या वर दिलेल्या कवितेत म्हणतात तसं ” आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फ़ार काही शिकवत असतात .” .
बाकी काही त्यांनी शिकवले नाही तरी इतके नक्कीच शिकवतात …की …पुन्हा सुधीर मोघे वर उल्लेख केलेल्या कवितेत ते म्हणतात तसं …
एक कृती , एक शब्द
एकच निमिष
हुकत , हुकत
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढे एक निमित्त पुरते .”
काय चुकले आणि काय हुकले ?
त्यातही आपण काही शिकत नाही असे तरी कसे म्हणणार ?
आपण शिकतो की …
सुधीर मोघे म्हणतात तसं ... “आपण मात्र शिकत असतो , पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी .”
निदान चूकणे आणि हुकणे यातले अंतर , यातले सातत्य कमी करण्या इतपत जरी शिकलो तरी !
नाही ना होत तसं पण ?
काय चुकले आणि काय हुकले ?
शेअरबाजारात अशा संधी परत मिळत नाहीत असं नाही . पण प्रत्येक संधीचे स्वरूप , सातत्य , प्रमाण हे वेगवेगळे असते .
असू शकते .
प्रत्येक नवीन संधीच्या वेळी आपली स्वतःचीही परिस्थिती वेगवेगळी असू शकते .
असते .
त्यामुळे आज गेलेल्या संधीत मिळू शकला असता असा फायदा पुढच्या वेळी मिळेलच असं नाही ना !
आणि मुळातच शेअरबाजार हे क्षेत्र इतके कनवाळू नाही आणि नसते .
इथे ” असेल हरी तर देईल खाटल्यावरी ” असं काही नाही . काही नसते . काही असणार नाही . या क्षेत्राचा हरी असला भारी आहे की तो असलेले खाटल ही काढून नेईल .
आपण ” योगा डे ” च्या दिवशी सार्वजनिक सतरंजी उचलून आणतो तशी …
अशावेळी सुधीर मोघे यांच्या आधी उल्लेख केलेल्या कवितेतल्या ” कणभर चुकिलाही आभाळाएवढी सजा असते ” ही ओळ आपला अनुभव बनते .
साथीदारही आणि साक्षीदारही !
अर्थात अशी चूक झाली म्हणून झालेल्या नफा – नुकसानीची गणित मांडून ही फारसा उपयोग नसतो .
कारण ” चूकणे ” ही वस्तुस्थिती असते आणि “‘ हुकणे ” ही नियती असते ..कदाचित वृत्ती ही …
सुधीर मोघे त्यांच्या कवितेत उगाचच सांगत नाहीत हो ….” चूक आणि शिक्षा यांचा ताळेबंद मांडायचा नसतो .”
आपण सगळेच इतके निर्ढावलेले आहोत याबाबत की आपण अस चुकणे आणि हुकणे याचेही रसभरीत वर्णन करत राहातो ….या लेखासारखे …
वर पुन्हा सुधीर मोघे आहेतच उधार – -उसनवार करायला …
ते म्हणतातच ना ….” क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून जातात .”
खरं तर सुधीर मोघे त्यांच्या कवितेत म्हणतात तसं
” हे सगळे घडत असते
आपण काही शिकण्यासाठी ” –
पण आपले मात्र ये रे माझ्या मागल्या …
आधीची कृती च ( केलेली आणि न केलेली ही ) परत परत उगाळत राहतो ….
अशा दरवेळी शेअरबाजार आपल्याला फक्त इतकेच सांगत असतो की …
.” प्रत्येक उगाळत राहाणे हे गंध नसते .”
काय चुकले आणि काय हुकले ?
सुधीर मोघे यांच्याच कवितेचा आधार घेत सरतेशेवटी इतकेच म्हणेन ……
“क्षण जगून झालेले
जुन्या पानांत जपावे
डोळ्यांतील पाण्यानेच
नवे पान उलटावे..”
काय चुकले ? काय हुकले ? ….आपले आणि शेअरबाजाराचेही ?
चन्द्रशेखर टिळक
२० मार्च २०२० .