आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. ज्ञानोबा माऊलींचाही आज जन्मदिवस .सारी आळंदी हा जन्मदिवस मोठ्या भक्तिभावाने ,दिमाखाने साजरा करण्यासाठी दरवर्षी सज्ज होत असते .यावर्षी तिथेही तशी शांतताच असणार. “कालायतस्मै नमः “. मात्र यानिमित्ताने आज सकाळपासून आठवतेय ती माझीआई- इंद्रायणी शिवलिंग जंगम- आमची “अक्का”. अक्का तशी एकनिष्ठ माऊलीभक्त. ज्ञानेश्वरी, हरिपाठ मुखोद्गत असणारी . संत तुकोबाराय ,संत नामदेवराय ,संत जनाई, आणि इतरही वारकरी संतांचे अभंग तिला पाठ होते . तिचा आवाज अतिशय गोड होता. अतिशय सुरेल पद्धतीने ज्यावेळी ती अभंग म्हणायची तेव्हा तो भाव समोर साक्षात उभा राहायचा. वारकरी परंपरेचा तिचा अभ्यास डॉ.हे.वि. इनामदार सर ,डाॕ.बाचल सर, डाॕ.नसिराबादकर ,प्रा.पां.ना.कुलकर्णी सर यांच्या कौतुकाचा विषय होता. ज्ञाननिष्ठा हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असल्यामुळेच माझ्या Ph.D.च्या क्षेत्रीय अभ्यासात ती सामील झाली. माझ्यापेक्षा जुन्या पोथ्य्या, हस्तलिखिते हाताळताना तीच अधिक रमून जायची,. याच्या जोडीला रोजची इष्टलिंग पूजा, परमरहस्य ,शिवलिलामृत, नवनाथकथासार सारख्या धार्मिक ग्रंथांचे पारायण आणि त्याच वेळी…..
हरी नारायण आपटेंपासून विश्वास पाटील पर्यंतचे कादंबरीकार , “तराळ -अंतराळ” पासून “आमचा बाप “पर्यंतचे दलितसाहित्य , केशवसुतांपासून कुसुमाग्रज-नारायण सुर्वे पर्यंतचे तिचे चौफेर वाचन होतेच. त्वष्टा कासार ,पुणे मराठी ग्रंथालय ,पुणे नगर वाचन या ग्रंथालयांतून तिच्यासाठी पुस्तके आणली तरी आमच्या वाड्यातील बाळूमामा पाबळकर यांच्या कॉलेजमधूनही ती पुस्तके मागवायची.
अखंड वाचन हाच तिचा ध्यास होता.तो इतका की दोन वेळेला कॅन्सरवर आणि अन्यही काही गंभीर आजारांवर तिने इच्छाशक्तीने मात केली. परंतु डोळ्यांना कमी दिसायला लागले ,वाचनात अडथळे आले तसे तिची जगण्याची इच्छाच जणू संपली, तिचे शेवटचे शब्द होते… “ताई आता वाचताना कमी दिसतंय, आता जगण्यात अर्थ नाही “……..असो…. स्वयंपाक करता करता नातवंडांना हरिपाठ शिकवणारी ,कुठल्याही ओवी पासून सुरुवात केली तरी मागची आणि पुढची ज्ञानेश्वरी तिला तोंडपाठ. माऊली हे तिचे आश्रयस्थान ,श्रद्धास्थान, अखेरपर्यंत तिची नवमीची आळंदी वारी कधी चुकली नाही. प्रत्येक नवमीला तिचा क्रम ठरलेला . सकाळी नऊ -साडे नऊ पर्यंत जमले तर त्यापूर्वीही घरातले सगळे कामकाज करायचे. “खुलभर दुधाच्या कहाणी “सारखे …घरातले सगळ्यांसाठी अगदी रात्रीपर्यंत पुरेल असा स्वयंपाक ,खायचे -प्यायचे करून ठेवायचे .बरोबर तीन भाकरी (एक स्वतःसाठी आणि दोन कोणत्याही रूपात येणाऱ्या तिच्या माऊलीसाठी ), केलेली भाजी, पाण्याची बाटली(आळंदीत सगळं चांगलं पाणी मात्र खराब यावर तिचे ठाम मत ) घेऊन निघायचे.आणि हो माऊलींच्या लेकींसाठी काहीतरी घेऊन जायचं …… या लेकी होत्या मंदिराच्या आसपासच्या दुकानातल्या महिला. तिथे काही खास नाती होतीअक्काची. कोणाची ती आत्या, कोणाची मावशी, कोणाची ताई . त्यांच्यासाठी तिला पुण्यातून काही न्यायचं असायचं.”अवघे विश्वची माझे घर ” हेच ती जगत होती .त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असे.चार पैसे गाठीला कसे ठेवायचे ,म्हणजे बँकेत कशी,कोणती खाती उघडायची ,हे ती सांगणार.शिवाय तोंडाने फटकळ .तिला कळाले एखादीचा नवरा ,मुलगा त्रास देतो तर तिथे दुकानावरच त्याची खरडपट्टी काढणार . अगदी मंदिरातील पुजारी ही तिला पुण्यातील अक्का म्हणून ओळखायचे.आम्ही म्हणायचोही तिला तुला आळंदीला महिनाभर तरी रोज एका घरात राहता येईल. …….आळंदीशी तिचे जणू जन्मोजन्मीचे नाते. माऊली तर तिचा श्वास. आठवतोय मला तिचा पहिला कॅन्सरचा प्रवास ….१९८८-९०काळातला..तिची केमोथेरपी चालू होती .. स्ट्रेचरवर झोपण्यापूर्वी ती प्रत्येक वेळी हात जोडून नमस्कार करायची. आनंदाने ट्रीटमेंटला सामोरी जायची. असे चार-पाच वेळा घडले.हे ते सारे तिथे ट्रिटमेंट देणारे डाॕ.पिंटो पाहत असायचे. शेवटी त्यांनी तिला विचारले, नमस्कार कोणाला करता? ती म्हणाली, “माझ्या माउलीला .तो काय तिथेच उभा आहे.” गम्मत म्हणजे जवळपास १७-१८ केमोथेरपी घेऊनही ना तिचे केस गळाले होते ना पांढरे झाले होते. डॉक्टरही तिच्या श्रद्धेपुढे नतमस्तक झाले .तिला म्हणाले , “माझ्या येशु नंतर तुझ्या माऊलीला भेटायलाच हवे…” तिचे हे भावबंध जे आम्हाला तीव्रतेने जाणवले ते तिच्या शेवटच्या आजारात, तिची एकच इच्छा होती , आता पायाने फिरता येत नाही आतापर्यंत दशमीची वारी कधी चुकली नाही. शेवटी एकदा भेटून येऊ माऊलींना. तिला आळंदीला घेऊन गेलो आणि ती गाडीतून उतरली ,बाजूच्या दुकानातली मंडळी ,मंदिरातले पुजारी अक्का आली अक्का आली म्हणून सामोरे आले. एखाद्या मंत्र्यालाही मिळणार नाही कदाचित अशी ट्रीटमेंट तिला मिळाली. तिच्यासाठी थोडावेळ दर्शनबारी बंद ठेवली गेली, …..फक्त ती आणि तिची माऊली, फक्त तिची माऊली आणि ती…. आत होती … माझ्या डोळ्यासमोर होती ज्ञानदेव वेडी आक्का. दशमीची वारी होतीच . पण तिची खास भेट जन्माष्टमीची !!
जन्माष्टमीच्या आधीपासूनच तिला आळंदीला जायचे वेध लागायचे. जणू माऊलींची विरहिणी, तिचा आवडता छंद ,म्हणा तिचा ध्यास म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी आळंदीला जायचेच, जमल्यास प्रभात पूजा ,सार्थक अभिषेक करायचा, दिवसभर त्या मंगलमय वातावरणात राहायचे, सकाळी नाही जमले तर संध्याकाळी तरी आळंदीला पोहोचण्यासाठी तिची लगबग असायची .माऊलींचा मध्यरात्री साजरा होणारा जन्मोत्सव जणू तिच्या तना-मनात उतरायचा आणि त्यानंतर घरी आलेली अक्का माऊलींच्या नामस्मरणात दंग असायची.तिच्याच तंद्रीत . ज्ञानोबा माऊलीच्या नामस्मरणात दंग .हात कामात .पण मन अजूनही माऊलींच्या राऊळातच ..
” मला आजही खात्री आहे आजही कोरोना असो ,कितीही शांतता असो आजही माझी आक्का माऊलींच्या सान्निध्यात , त्यांच्या नामस्मरण दंग झालेली आळंदीच्या राऊळातच सापडेल…”