शीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण संपुर्ण तथ्य तितकेच नाही. त्यापेक्षाही त्यायोगे सत्तर वर्षातील, भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय घडामोडी, त्यातली लोकशाही, राजकीय पक्षांची जडणघडण आणि निवडणूकांचा इतिहास याचाही आढावा घ्यावा, असा हा प्रयत्न आहे. एखादा पक्ष जिंकतो का आणि अन्य कुठले पक्ष पराभूत कशाला होतात? कुठल्या पक्षाचा जिर्णोद्धार कसा होतो, किंवा एखादा पक्ष अस्तंगत कसा होत जातो? मतदार कशा मनस्थितीत व कोणत्या निकषावर मत बनवतो, किंवा मतदान करतो? वरकरणी जाणकारांनाही दिसू नसलेली राजकीय लाट का निर्माण होते, किंवा लाट नसलेल्या निवडणूकीचे निकाल कसे लागतात? सत्तेविषयीची नाराजी व सत्ता बदलण्यातली उदासिनता, मतदाराला कसे प्रभावित करतात? राजकीय विचारधारा मतदानाला किती प्रभावित करतात, किंवा राजकीय तत्वज्ञानाचा मतदानावर का परिणाम होत नाही? स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय सामाजिक व्यवस्था कशी निर्माण विकसित होत गेली व भारतीय लोकशाहीत, या व्यवस्थेने कोणती कामगिरी बजावली? व्यवस्था बदलण्याचे कोणते प्रयत्न झाले व कसे हाणून पाडले गेले, किंवा एकूणच परिवर्तनाची भाषा सतत बोलली जात असताना परिवर्तनात कोणते अडथळे कोणाकडून आणाले गेले? इत्यादी प्रश्नांचा उहापोह करावा, अशी या पुस्तकामागची मुळ कल्पना आहे. त्याच आधारावर यातले निष्कर्ष काढलेले आहेत आणि नेहमीच्या ठाशीव निकषांवर हे विश्लेषण केलेले नाही. राजकीय विचार व ते मांडणार्यांची भाषा आणि प्रत्यक्ष व्यवहार, यांची झाडाझडती करायचा हा प्रयत्न आहे.
Reviews
There are no reviews yet.