डॉ.परीक्षित शेवडे यांनी ‘समर्थ’ चे केलेले विशेष विवरण !

‘समर्थ’

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अत्यंत मोठी आणि वैभवशाली संतपरंपरा या मातीने अनुभवली. संतांनी परमार्थ कथन केला हे जरी खरे असले तरी त्यांनी लौकिकाचा यशस्वी मार्गदेखील दाखवला. सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने हिंदू पदपादशाहीची पुनर्स्थापना होत असतानाच सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांतून या स्वराज्याला पूरक असा एक हुंकार घुमत होता…’जय जय रघुवीर समर्थ’. समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचा दासबोध हे आजही आपले श्रद्धास्थान आहे. मात्र त्यांच्या जीवनाबाबत नेमकी आणि ससंदर्भ माहिती आपल्याला किती प्रमाणात असते? समर्थांची चरित्रे ही आजवर अनेकांनी लिहिली आहेत. म्हणजे अगदी समर्थांच्या वंशातल्या हनुमानस्वामींपासून ते त्यांच्या समकालीन आणि उत्तरकालीन शिष्यांपर्यंत अनेकांनी. ही चरित्र अनेकदा बखररूपी आहेत, अनेकदा काव्यरूपी आहेत. मात्र त्यांतील विश्वासार्ह म्हणावा असा चरित्रग्रंथ म्हणजे प्रामुख्याने गिरिधरस्वामी कृत ‘समर्थप्रताप’. समर्थाप्रतापात आपल्याला समर्थांच्या जन्मापासूनच्या साऱ्या हकीकती वाचायला मिळतात, आणि शक्यतोवर पुढील बखरकारांनी समर्थांच्या ज्या अतिशयोक्तीपूर्ण चमत्कारांचा उल्लेख केला आहे ते सगळं टाळून गिरिधरस्वामींनी शक्य तितक्या घटना जशा घडल्या त्याप्रमाणे दिल्या आहेत. पण या व्यतिरिक्त अनेक ग्रंथांत प्रसंगानुरूप काही अतिशयोक्तीपूर्ण चमत्कार, आध्यात्मिक संदेशांवर भर अशीच रचना आढळते. म्हणजेच ‘चरित्रग्रंथ’ म्हणून संग्रहमूल्य या ग्रंथांना नाही. मग समर्थांचे चरित्र नेमके कसे अभ्यासावे? हा प्रश्न पडला असता कौस्तुभ कस्तुरे लिखित आणि मोरया प्रकाशन प्रकाशित ‘समर्थ’ हे पुस्तक हाती पडले. कस्तुरे हे तरूण आणि मेहनती इतिहास अभ्यासक म्हणून विशेषत: समाजमाध्यमांवर सुपरिचित असलेले नाव. ‘इतिहासाच्या पाउलखुणा’ नामक ससंदर्भ इतिहास वाचकांसमोर ठेवणाऱ्या फेसबुक गटाचे ते संचालकदेखील आहेत. याच नावाने अन्य अभ्यासक मंडळींसह त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. शिवाय ‘पेशवाई’, ‘पुरंदरे’ अशा अभ्यासपूर्ण पुस्तकांचे ते लेखक आहेत.

कस्तुरे यांचा अभ्यास हा वादातीत आहे. ‘समर्थ’ हे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणता येईल. ग्रंथात जागोजागी ते अस्सल समकालीन संदर्भ देत समर्थांचे जीवन आपल्यासमोर उलगडत जातात. या पुस्तकातून आपल्याला सामान्यतः माहिती नसलेल्या अत्यंत रोचक बाबी समोर येतात. उदा. ‘सेतुमाधवराव पगडींनी त्यांच्या ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ या पुस्तकात ‘शहा तुराब यांच्या मन-समझावन काव्यातील समर्थांची शिकवण’ या पाठाअंतर्गत एक वेगळीच रोचक माहिती दिली आहे. सव्वादोनशे वर्षांपूर्वी शहा तुराब चिश्ती नावाच्या सुफी कवीने समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं उर्दूत भाषांतर केलं. यात स्वतः कवी म्हणतो, “ऐ उसकी मन की कोधी का जवाब है । के जिसका रामदास जग में ‘किताब है ।”. म्हणजे हे काव्य जे मी करत आहे ते मूळ त्या माणसाच्या मनातील शंकांचं त्यानेच केलेलं निरसन असून हा माणूस म्हणजे ज्याला जगात रामदास म्हणून ओळखलं जातं.’ ही रोचक माहिती आपल्याला कस्तुरे यांच्या योगाने लक्षात येते. समर्थांनी अकरा मारुती स्थापन केले. यातील ‘अकरा’ या आकड्याबाबत समर्थांच्याच लेखणीतून कस्तुरे यांनी दिलेले दाखले प्रत्यक्ष वाचण्याजोगे आणि आपल्या माहितीत अमुल्य भर घालणारे आहेत.

समर्थांचे नाव ऐकताच आपल्यासमोर नाव येते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. समर्थ आणि शिवछत्रपती यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचे खंडीभर अस्सल पुरावे कस्तुरे आपल्यासमोर ठेवतात. चाफळची अस्सल सनद हा त्यांतील एक पुरावा. या सनदेचे प्रमाणीकरण करण्यातही कस्तुरे यांची महत्वाची भूमिका आहे. आपल्या पुस्तकात शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या वंशजांनी-अधिकाऱ्यांनी समर्थ आणि संप्रदायाला दिलेली अनेक पत्रे व समकालीन साहित्य अभ्यासून झाल्यावर ते लिहितात; ‘शिवाजी महाराजांना समर्थांचा अनुग्रह झाला हे नक्की, पण तो इ.स. १६४९ मध्ये नसून इ.स. १६७२ मध्ये झाला. यासंबंधी देवांनी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांतच दोन पत्रं आपल्याला अतिशय महत्वाची सापडतात. श्रीसंप्रदायाची कागदपत्रे खंड १ मधील लेखांक १९५ वाचला असता त्यात अनंत गोसावी म्हणून एक समर्थशिष्य स्पष्ट लिहितात, “पूर्वी कैलासवासी सीवाजीराजे भोसले यांसी परिधाविनाम संवत्सरी शिंगणवाडीचे मठी श्रीहनुमंतासमोर परमार्थ जाला”. यावेळी शिवाजी महाराजांसमवेत रामचंद्रपंत अमात्य आणि दत्ताजीपंत मंत्री हे अष्टप्रधान मंडळातील दोन मंत्रीही होते हेसुद्धा या पत्रातून दिसतं. हा परिधावी संवत्सर म्हणजे शालिवाहन शके १५९४ दि. १९ फेब्रुवारी १६७२ रोजी गुढीपाडव्याला सुरु झाले आणि दि. ८ मार्च १६७३ ला संपले. म्हणजे या दरम्यान कधीतरी शिवाजी महाराजांना समर्थांचा अनुग्रह झाला हे उघड आहे.’ भास्कर गोसावी यांनी दिनकर गोसावी यांना लिहिलेल्या पत्राचा आधार घेत इ.स. १६५८ मध्ये शिवरायांना समर्थ संप्रदायाची माहिती पहिल्यांदा झाली असावी; असा निष्कर्ष ते मांडतात. आणखी काही समकालीन पत्रांच्या आधाराने कस्तुरे पुढे लिहितात; ‘बहुदा समर्थांकडून शिवाजी महाराजांना समजलं असावं की चाफळच्या उत्सवादरम्यान शिपायांचा काही त्रास होतो, आणि म्हणूनच, श्रावण शुद्ध ९ शके १५९४ म्हणजेच दि. २३ जुलै १६७२ रोजी शिवाजी महाराजांनी दत्ताजीपंत मंत्र्यांना पत्र पाठवून चाफळच्या रामनवमीच्या यात्रेत तुर्कांचा आणि चोराचिलटांचा उपद्रव होऊ देऊ नका म्हणू आज्ञा केली (श्री.सं.का.१ ले.१०). यासोबतच कोळ सुभ्याच्या सुभेदार गणेश गोजदेवालाही याच दिवशी पत्रं गेलं (श्री.सं.का.१ ले.११). साधारण इथपासून शिवाजी महाराजांचा समर्थ संप्रदायासंबंधीचा पत्रव्यवहार आपल्याकडे आज उपलब्ध आहे.’ थोड्क्यात; समर्थ ही शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेमागील प्रेरणा होती हा गैरसमजच; मात्र त्यांची भेटच झाली नाही हीदेखील अतिशयोक्ती असल्याचे कस्तुरे यांनी सप्रमाण दाखवले आहे.

शिवसमर्थ संबंध हे पुढील काळात घनिष्ट होत गेल्याचे आपल्याला दिसते. महाराजांनी समर्थांना निवासास सज्जनगडावर व्यवस्था करणे, समर्थांनी महाराजांना लिहिलेली राजधर्म, क्षात्रधर्म ही पत्रे (ही पत्रेही पुस्तकात दिली आहेत.) छत्रपती शंभूराजांना लिहिलेले पत्र, शंभूराजांनी बांधलेली समर्थांची समाधी याहून अधिक पुरावे काय बरे हवेत? समर्थ या पुस्तकात केवळ हाच विषय आलेला नसून अस्सल समकालीन संदर्भांसह कथन केलेले प्रामाणिक समर्थचरित्र असे संदर्भमूल्य या पुस्तकाला आहे. या दस्तऐवजांची छायाचित्रे पुस्तकात प्रसिद्ध करून लेखकाने आपली प्रामाणिकता समोर ठेवली आहे. पुस्तक बांधणी-छपाई यांतही अव्वल आहे. समर्थभक्त, इतिहास अभ्यासक, जिज्ञासू मंडळींनी संग्रहात ठेवावे असे हे एक उत्तम अभ्यासपूर्ण पुस्तक वाचनात आल्याने वाचकांपर्यंत पोहचवल्याशिवाय राहवले नाही. जय जय रघुवीर समर्थ|

वैद्य परीक्षित शेवडे

Hello world!

October 26, 2019

सौ.स्मिता भागवत लिखित '#सरदार...वल्लभभाई पटेल ' या मोरया प्रकाशन लवकरच प्रकाशित करीत असलेल्या महत्वपूर्ण ग्रंथातील काही भाग...

October 26, 2019

Leave a Reply