मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रांची जीवनगाथा असंख्य साहित्यिकांनी विविध भाषांतून अनेक प्रकारे गाईली. भगवान् श्रीराम सर्व उदात्त जीवनमूल्यांचे म्हणजेच धर्माचे साकार असल्याने त्यांचे नितांत रमणीय व अनुकरणीय चरित्र ज्याप्रमाणे राष्ट्रीय अस्मितेचा कणा ठरले तद्धतच केवळ रामदास्यासाठी देह धारण करणाऱ्या राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचे महनीय चरित्रही सात्विक स्फूर्तीचा अखंड प्रवाह असल्यामुळे भव्योदात्त आणि अनुकरणीय आहे. म्हणून त्या पावन चरित्रावर चालवून आपली लेखणी व वाणी पवित्र करण्याचा सात्विक मोह असंख्य सत्पुरुषांना होणे स्वाभाविक होय.
याच प्रेरणेचे सुमारे १७२ वर्षांपूर्वी भाग्यनगर (हैदराबाद) च्या श्री योगीराज महाराजांनी ‘दासलीला हे समर्थ रामदासांचे छत्तीस अध्यायी ओवीबद्ध चरित्र लिहीलेले आढळते. लिखाणानंतर ही ते सुमारे १०० वर्षे केवळ हस्तलिखित स्वरूपातच पुढे चालू राहिले होते. सुमारे ६० वर्षापूर्वी त्यांच्या प्रशिष्यांनी ते पहिल्यांदा मुद्रित स्वरूपात पुढे आणले खरे, पण तेही बरीच वर्षे उपलब्ध नव्हते.
अत्यंत सोपी, गोड रसाळ आणि प्रासादिक रचना असलेले,यती आनंद चैतन्य स्वामी यांच्या आज्ञेने व कृपाशीर्वादाने योगीराज महाराजांना स्फुरलेले हे ओवीबद्ध समर्थ चरित्र म्हणजे आनंदाचा ठेवाच आहे.
समर्थ संप्रदायात दासबोध पारायणाची परंपरा चालत आली आहे. या पुढे दासलीला या प्रासादिक चरित्राच्या पारायणाचीही जोड त्याला मिळावी याच उद्देशाने मोरया प्रकाशन आणि दासबोध सखोल अभ्यास उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने दासलीला चे पुनर्मुद्रण व प्रकाशन
दा.स.अ.उपक्रमाच्या संस्थापक समर्थ भक्त प.पू.कै. अक्का वेलणकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत दिल्ली पासून ते तंजावर पर्यंत पसरलेल्या समर्थ संप्रदायाच्या २५ प्रमुख केंद्रात होते आहे.
कारण या ग्रंथाचे पठण, श्रवण, मनन म्हणजेच मनोभावे पारायण हेच कलियुगात चिंतामुक्तीचे, समर्थ कृपेचे सुलभ साधन आहे असे योगीराज महाराजांनी निश्चितपणे या ग्रंथाच्या शेवटी सांगितले आहे. योगीराज म्हणतात..
दासलीला सुरद्रुम | मोक्षफळें दाटला परम |
भाविकाचें सकळ काम |
पूर्ण होती ||
हा दासलीला चिंतामणी |
नुरू देचि चिंता मनी |
भाविकाते सायुज्यदानी |
समर्थ होये ||
सद्भावे करिता ग्रंथाचे श्रवण |
सकळ पातकें होती दहन |
ज्ञान वैराग्य भक्ति पूर्ण |
उपजे चित्ती ||
Reviews
There are no reviews yet.