खरे तर मला कादंबरीत व्यक्त होणे आवडते. पण सरदार वल्लभभाईंचे विराट व्यक्तिमत्व कादंबरीच्या आकृती बंधात बसवणे पटेना. कठोर,कणखर, लोहपुरुष, दृढनिश्चयी सरदारांचे
देशहितास वाहिलेले जीवन म्हणजे त्या काळचा इतिहास! पण मला ही निर्मिती इतिहासात अडकलेली सनावळी होणेही नको होती. म्हणून सुरूवातीस सरदार स्वातंत्र्यसंग्रामात उतरले तत्पूर्वीच्या त्यांच्या कष्टमय जीवनाचे दर्शन पहिल्या भागात, गांधीजी आणि नेहरु हे दोघेही बॅरिस्टर होते. त्यांची राजकीय कारकीर्द झळझळीत असली तरी ते वकीलीत गाजले नव्हते. पण बॅरिस्टर वल्लभभाईं पटेलांची ही कारकीर्दही यशाची परिसीमा होती.वल्लभभाईंच्या या जीवनातील निवडक घटना आणि कोर्टात गाजवलेल्या पराक्रमाचे निवडक किस्से दुसऱ्या भागात नमूद करणे आवश्यक वाटले.
राजपुरुष सरदार पटेलांची कारकिर्द विशाल! समांतर घडणाऱ्या घटनातही एकावेळी अनेक समस्या ते कौशल्याने हाताळत. त्या घटना महत्वाच्या घडामोडी या सदरात सविस्तर मांडल्या आहेत. गांधी, सरदार आणि नेहरू मतभेदांचा तटस्थ आढावा घेत दिग्गजांच्या दृष्टीकोनातून सरदारदर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. या कशातही सामावू न शकलेले महत्वाचे घटित परिशिष्टात समाविष्ट केले आहेत कारण ललित लेखनाच्या शैलीतील असले तरी हे लिखाण आहे आपला इतिहास! म्हणून
सत्य आणि तथ्य दोन्हीचा तौलनिक विचार करून, शक्य तितके संदर्भ तपासून, तटस्थपणे मिळवलेली माहिती सादर करणे मला आवडते तितकेच कर्तव्यही वाटते. त्याच दृष्टीकोनातून या ग्रंथाची मांडणी केली आहे.
तान्हेपणी मला सरदारांचा आशीर्वाद लाभला होताच. आता जवळपास त्यांच्या वयाची होत असताना मला या लोहपुरुषास मनोमन वंदन करून आशीर्वाद मागावासा वाटला. तशी आशीर्वादासाठी याचना करून मी कलम परजली. त्याचे हे फलीत!
स्मिता भागवत
Reviews
There are no reviews yet.